पुणे - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार पाठिंबा जाहीर करण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांनी दिली.
हेही वाचा- 'भाजप-सेनेचे राजकारण जाती-धर्माच्या नावाने जनतेत दुफळी निर्माण करणारे'
मनसे पदाधिकाऱ्यांकडून सुनिल शेळके यांना पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रथम सुनिल शेळके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. हा पाठिंबा बिनशर्त आहे, हेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. मनसेला सोबत घेऊन काम करताना आमची ताकद दुपटीने वाढणार आहे. यापुढे मनसे बरोबर विचार विनिमय करुनच तालुक्यासंदर्भात निर्णय घेतले जातील असे शेळके म्हणाले.
मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजताच सुनील शेळके यांनी प्रचार सुरू केला होता. मात्र, भाजपमधून त्यांच्या ऐवजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ते नाराज झाले होते. अपक्ष निवडणूक लढवणार, अशी दाट शक्यता असताना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवारी त्यांनी स्विकारली. यामुळे मावळ मधील लढत अधिक रंगतदार झाली. आता मावळ मनसेने सुनील शेळके यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या सर्वांचा फायदा शेळके यांना होईल असं बोललं जात आहे.