पुणे MNS On Marathi Name Plate : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब करत मराठी पाट्यांची सक्ती केली होती. इंग्रजी पाट्या मराठीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपताच मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील जंगली महाराज रोडवर मनसेच्यावतीनं आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी इंग्रजी भाषेत असलेल्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड देखील करण्यात आली. यावेळी चार-पाच दुकानांवर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्या मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या.
...म्हणून आम्ही आंदोलन करतोय : मराठी पाट्या लावण्याची 25 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सर्व शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनांमध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे आणि व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम 1948 अन्वये बंधनकारक आहे. मात्र, असं असताना देखील पुण्यात तसंच राज्यभर दुकानदारांकडून इंग्रजीमध्ये पाट्या लावण्यात आल्या आहेत. म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत, असं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
अन्यथा मनसे स्टाईलनं खळ्ळ-खट्याक : यावेळी बोलत असताना मनसेचे नेते बाळा शेंडगे म्हणाले की, सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन देखील मराठीमध्ये पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत. आज आम्ही फक्त जे ब्रँड आहे त्या दुकानांची तोडफोड करत आहोत. आमचा इशारा आहे की सर्वांनी मराठीमध्ये पाट्या लावाव्या. अन्यथा आम्ही मनसे स्टाईलनं पुन्हा एकदा खळ्ळ-खट्याक करू.
ठाण्यात इंग्रजी पाट्यांवर फेकले काळ्या शाईचे फुगे : ठाण्यातील मनसैनिकांनी 26 नोव्हेंबर रोजी मानपाडा येथील एमजी मोटर्सच्या शोरूमच्या इंग्रजी पाटीवर काळ्या शाईचे फुगे फेकून निषेध नोंदवला. तसंच ठाण्यातील सर्वच आस्थापनांवर असलेल्या इंग्रजी पाट्यांना त्वरित मराठीतून करावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाण्यातील मनसैनिक स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला. त्यामुळं आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा -