पिंपरी चिंचवड (पुणे) - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे वेगवेगळ्या मुद्यावर महाविकास आघाडीवर ताशेरे ओढत असतात. असे असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांची मदत केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसनेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी जलपर्णी प्रश्नावर आक्रमक होत सभागृहाच्या दालनाबाहेर गळ्यात जलपर्णी घालून ठिय्या मांडला. तेव्हा, त्यांना सभागृहात घेण्याबाबत मनसेचे नगरसेवक सचिन चिखले आक्रमक झाले होते.
हेही वाचा - महाराष्ट्रात फळांचा केक कापण्याचा ट्रेंड, शेतकऱ्यांसाठी सुरू झाली एक नवी मोहीम
शहरात जलपर्णीमुळे डासांचे प्रमाण वाढलं
पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पवना नदीत जलपर्णीचा विळखा झाला असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांचं प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. थेरगाव परिसरात जलपर्णीमुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांमुळे नागरिक त्रस्त असल्याने शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी थेट गळ्यात जलपर्णी घालून सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरकशा रक्षकांनी अडवले आणि महापौरांनी तसे आदेश दिल्याचे सांगितले.
मनसेचे नगरसेवक चिखले शिवसेनेचे नगरसेवक यांच्या मदतीला धावले
दरम्यान, मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी सभागृबाहेर येऊन सुरक्षा यांच्याशी संवाद साधत ठणकाहून शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले याना आत सोडण्याची विनंती केली. तेव्हा, चिखले चांगलेच संतापले होते. आक्रमक होत भोसले याना सोडावे असे त्यांनी सांगितले त्यांना सभागृहात रेटण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. मात्र, सुरक्षा रक्षक सोडण्यास तयार नव्हते.
नगसरसेवक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झटापट
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त विनायक ढाकणे हे माहिती घेण्यासाठी बाहेर आले असता त्यांच्या गळ्यात जलपर्णी टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळी नगरसेवक भोसले आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झटापट झाली. त्यानंतर मात्र त्यांना सभागृहात सोडण्यात आले.
राज ठाकरे महाविकास आघाडीवर चौफेर टीका करत आहेत तर...
एकीकडे मनसेचे राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढत असून दुसरीकडे पिंपरीमधील एकुलते एक नगरसेवक सचिन चिखले हे महाविकास आघाडीच्या नगरसेवकाच्या मदतीला धावून गेल्याने स्थानिक राजकारणात सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा - 'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको', वाझेंची विशेष न्यायालयात याचिका