पुणे - औरंगाबादच्या नामांतरणासाठी आता पुण्याच्या ग्रामीण भागातून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांच्यासह मनसैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत राजगुरूनगर बसस्थानकामध्ये आंदोलन केले. यावेळी मनसैनिकांनी राजगुरूनगर बस स्थानकातून औरंगाबादला निघालेल्या एसटी बसच्या फलकावरील औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज नगर असा फलक लावला.
छत्रपती संभाजीनगरासाठी मनसे आग्रही-
औरंगाबादच्या नामांतरानासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरुन आंदोलन केली जात आहेत. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातूनही नामांतराच्या मागणीचे समर्थन केले जात आहे. ग्रामीण भागातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर या नावाचा आग्रह धरत आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी पुणे जिल्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजगुरूनदर बसस्थानाकात प्रवेश केला. येथून औरंगाबादला जाणाऱ्या बसच्या फलकाचे त्यांनी छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करत आंदोलनाला सुरुवात केली. तसेच औरंगाबादच्या नामांतरासाठी जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करेल, त्यांच्या भूमिकेवर मनसे पुढील काळात आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांनी दिला.
विरोध करणाऱ्यांविरोध मनसे होणार आक्रमक...
औरंगाबाद जिल्ह्याचे नामंतर करुन हिंदू धर्माचे दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे. या नावाला सर्वचस्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात गावांगावातून मनसेच्या वतीने निषेध नोदविला जात आहे. या आंदोलनावेळी यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी,नितीन ताठे,मंगेश सावंत,सोपान डुंबरे उपस्थीत होते.