दौंड - मध्य रेल्वेच्या दौंड रेल्वे स्थानकात सध्या आठ रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात आहे. या गाड्यांमधून रात्री व पहाटे काही प्रवासी उतरत असतात, या प्रवाशांची कुठल्याही प्रकारची तपासणी प्रशासनातर्फे केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्याकडे केली होती. तेव्हा कुल यांनी तहसीलदार संजय पाटील यांच्यासह प्रशासनाला प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमधून उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी होणे गरजेचे आहे. दौंड रेल्वे स्टेशनमध्ये उतरणाऱ्या कुठल्याही प्रवाशांची तपासणी केली जात नाही. कोरोनाच्या काळात त्या प्रवाशाची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी आमदार राहुल कुल यांना याबाबतची माहिती दिली. तसेच त्यांनी दौंडमध्ये या कारणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढेल अशी भीती व्यक्त केली. नागरिकांच्या या माहितीची दखल घेत आमदार कुल यांनी प्रशासनाची एक बैठक घेतली.
या बैठकीत कुल यांनी तहसीलदार संजय पाटील यांना प्रत्येक प्रवाशांची तपासणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच त्यांनी नगरपालिकेने प्रत्येक घरात मास्क देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचनाही नगरपालिका प्रशासनाला केली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी शहरात सुरू असणाऱ्या उपाययोजनेबाबत माहिती दिली. तसेच ज्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे, त्या ठिकाणी फवारणी सुरू असल्याचे सांगितले. यापुढे शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
या बैठकीस तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे, नगराध्यक्षा शितल कटारिया व नगरसेवक उपस्थित होते.
हेही वाचा - 'आषाढी वारीतून कष्टकरी, बळीराजाला बळ मिळू दे' कार्तिकी गायकवाडचे पांडुरंगाला साकडे
हेही वाचा - 'मुख्यमंत्री कोरोनाचा सामना करू शकले नाहीत; सरकारच्या बेशिस्तपणानेच रुग्णसंख्या वाढली..'