बारामती - राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जंक्शन (ता. इंदापूर) येथे विनामास्कचा १०० रुपयांचा दंड भरला असून जनतेने भरणे यांच्या कृतीचा आदर्श घेऊन विनामास्क फिरणे बंद करून कोरोना आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अनेक ठिकाणी गर्दी होत असून सुरक्षित अंतराचा नियम पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या तोंडावर रुग्ण वाढू लागल्याने इंदापूरकरांसाठी धोक्याची घंटा आहे. आज रविवार (ता.१) रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते जंक्शनमध्ये एका खासगी दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक नागरिक विनामास्क कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होते. यावेळी भरणे यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. भाषण सुरू असताना भरणे यांचा मास्क खाली सरकला होता. भाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरला.