पुणे: ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचे अधिकाधिक प्रमाणात आर्थिक समावेशन झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल. महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरूकता वाढविण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी पुण्यात दिली. (Bhagwat Karad press conference in pune). ते आज पुणे विभागाच्या बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
फेरीवाल्यांना स्वनिधी योजनेचा लाभ: फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री योजनेचे कर्ज वाटप करण्यासाठी बँकांच्या अडचणी आणि त्यावर उपाय यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. यापुढे फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यांचं कुठलंही मागचं रेकॉर्ड किंवा सिविल स्कोर पाहिला जाणार नाही, असे आदेश केंद्राने सर्व बँकांना दिला असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. प्रथम १० हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास नंतर २० हजार व त्यानंतर ५० हजार रुपये कर्ज देण्यात येईल. बैठकीत ठरविलेले उद्दिष्ट एका महिन्यात पूर्ण करून गोरगरिबांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बँक आपल्या दारी प्रयोग: भारताची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर सर्वसामान्य लोकांची बँकेमध्ये देवाण-घेवाण वाढली पाहिजे. त्यासाठी आम्ही बँका आणि सर्वसामान्य लोकांच्या मधला दुवा होऊन ही देवाण-घेवाण वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. बँक आपल्या दारी हा एक नवीन प्रयोग सध्या सुरू करण्यात आलेला आहे. त्याची प्राथमिक स्तरावर चाचणी चालू असून पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातील पुणे आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये सध्या हा प्रयोग चालू आहे. देशभरात दहा जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग चालू असल्याची माहिती भागवत कराड यांनी दिली.
पुणे विभागाची बैठक: स्टेट लेवलची बँकिंग कमिटीची बैठक आज पुण्यात घेण्यात आली. पुणे विभागाची ही बैठक होती. या बैठकीत सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह पाच जिल्ह्यांचा समावेश होता. या पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नगरपरिषदचे आयुक्त सर्वांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, सांगलीचे खासदार संजय काका पाटील, माढा खासदार रणजीत सिंह निंबाळकर, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सहभागी झाले होते.