पुणे - कोरोनाचा कहर वाढत चालला असून याचा फटका आता शेती व्यवसायाला बसत आहे. संचारबंदीमुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम होत आहे. सध्या दुधाचे भाव 32 रुपयांवरून थेट 20 रुपयांवर आली आहे. यामुळे दुग्ध व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
दुग्ध व्यवसायासाठी जनावरांना लागणाऱ्या चारा, कडबा, खुराक यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल 25 ते 30 रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, हेच दूध सध्या 20 रुपये प्रती लिटरने विकले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल बारा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे जनावरांना लागणारा चाराही संचारबंदीमुळे वेळेवर मिळत नसल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
कोरोनामुळे दूध व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने दूध संघ अडचणीत आला आहे. कामगारांची घटलेली संख्या, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, दूध प्लांट चालवण्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीचा अपुरा पुरवठा व दूध पावडरचे घटलेले ग्राहक आणि कोरोनामुळे शहरात होणारा दुधाचा कमी पुरवठा यामुळे दुधाचे दर घसरल्याचे कात्रज दूध संघाचे चेअरमन विष्णुकाका हिंगे यांनी सांगितले आहे.
कोरोनाचे संकट शेती बरोबर दुग्ध व्यवसायावर आले आणि याच दुधाची विक्री पाण्याच्या किमतीत होत आहे. त्यामुळे हे संकट वेळीच सावरले नाही, तर पुढील काळात दुग्ध व्यवसाय आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कोरोना: मुंबईत कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची नोंद; एकूण संख्या 123