पुणे - लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध भागात अडकून पडलेल्या परप्रांतीय नागरिकांचा धीर आता सुटत चालला आहे. दीड महिना झाला कामधंदा नाही, खायला वेळेवर मिळत नाही अशात हे नागरिक कुठल्याही वाहनांची वाट न पाहता पायीच गावाच्या दिशेने निघाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळी कांचनजवळ कर्नाटकच्या दिशेने निघालेला असाच एक श्रमिकांचा जथ्था पोलिसांनी अडवला. ५० ते ६० जणांच्या या जथ्थ्यात ६ महिन्याच्या बाळापासून ८० वर्षाच्या वृद्धाचा समावेश होता.
बोरिवली, कल्याण, पनवेल, कर्जत अशा वेगवेगळ्या शहरातून हे नागरिक मागील पाच सहा दिवसांपासून पायपीट करीत गुलबर्गा येथे जाण्यासाठी निघाले आहेत. पहाटे लवकर उठून चालणे आणि दुपारी एखाद्या झाडाच्या सावलीत आराम करणे, असा त्यांचा दिनक्रम. रस्त्याने चालताना एखाद्या गावात जे काही खायला मिळेल ते खायचे आणि पुढे चालायचे, असा प्रवास करत गुरुवारी चार वाजता ते उरळी कांचन गावात पोहोचले. पण, येथे पोलिसांनी त्यांना थांबवून ठेवले.
बोरीवलीतून ५ दिवसांपूर्वी निघालेला उमेश शेट्टी चव्हाण म्हणतो, रोजगार मिळणे बंद झाले म्हणून मी गावाकडे निघालो. पण, पोलीस आता पुढे जाऊ देत नाहीत. परत माघारी जायला सांगतात. हे सरकार आमच्यासारख्या गरिबांचे ऐकणार आहे की नाही, की फक्त श्रीमंत लोकांसाठीच काम करणार, असा सवाल त्याने केला.
कल्याणवरून निघालेली एक महिला म्हणाली, मुंबईला येऊन आठच दिवस झाले होते. नुकतीच कामाला लागले होते. शेतीच्या कामासाठी पाऊस सुरू झाला, की गावी जाणार होतो. रस्त्याच्या कडेला राहायचो, मिळेल ते खायचो. पण, आता आमच्यावर ही परिस्थिती आली. सरकार ना खायला देत ना गावी जायला गाडी. पायी गावाला निघालो तर पोलीस अडवतात आणि कुठेतरी नेऊन सोडतात. किती दिवस असे चालत राहणार, असा सवाल या महिलेने उपस्थित केला.
सहा महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन निघालेल्या एका महिलेनेही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, पंधरा दिवसांपासून आम्ही गावी जायला निघालो. पोलीस पकडतात आणि दूर कुठेतरी नेऊन सोडतात. खायलाही काही देत नाहीत. तुम्हाला खायला तीन वेळेस लागते, मग आम्हाला का नाही. सरकारने धान्य दिले तर ते सर्वांनाच द्यायला पाहिजे. गाड्या सोडल्या तर सगळ्यांसाठीच सोडायला पाहिजे, अशी मागणी या महिलेने केली. इतका त्रास देण्यापेक्षा सरकार विष देऊन आम्हाला मारून का टाकत नाही? असा सवालही या महिलेने उपस्थित केला.
या लोकांच्या डोळ्यात अगतिकता दिसत होती. कुणीतरी येईल आणि आपल्याला मदत करेल, या आशेवर त्या बसल्या होत्या. ज्या पोलिसांनी त्यांना बसवून ठेवले होते, त्यांचेही हात बांधलेले होते. या लोकांसाठी राहण्या-खाण्याची तात्पुरती व्यवस्था केली जाईल, असे एका पोलिसानी सांगितले. यांना पुढे जाऊ द्यायचे की नाही, याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील, तोपर्यंत त्यांना इथेच थांबावे लागणार असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने म्हटले.
हेही वाचा- चाकण खेड परिसरातून राज्यांतर्गत 9 तर परराज्यात 2 बस रवाना; रेल्वेच्या व्यवस्थेची तयारीही सुरू