पुणे - महामेट्रोकडून डेक्कन ते पुणे महानगर पालिका या भागातील मुळा नदीपात्रात प्रचंड राडारोडा टाकून मोठमोठाले भराव तयार केले जात आहे. या भरावाच्या माध्यमातून डेक्कन ते मनपा इमारत या दरम्यानचा नदीचा प्रवाह भविष्यात वळवला जाणार आहे. त्यामुळे, पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यास किंवा नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्यास नदी लगतच्या पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, हे काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली.
हेही वाचा - धक्कादायक! हॉटेलमधील महिला स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून पुणे शहरात मेट्रोरेलसाठी मार्गिका तयार करण्याचे काम चालू आहे. त्यापैकी पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पात्रामधून देखील मेट्रो जाणार आहे. साधारणत: डेक्कन जिमखाना ते पुणे महानगर पालिका अशा मार्गासाठी नदी पात्रात पूल उभारणी करून त्यावरून मेट्रो नेली जाणार आहे. या मार्गाला परवानगी देतेवेळी देखील या भागातील नदीच्या प्रवाहाला कोठेही अडथळा होणार नाही, कुठेही भराव टाकले जाणार नाही, अशा स्वरुपाचे प्रस्तुतीकरण मेट्रोकडून केले गेले होते. मात्र, गेल्या काही महिन्यात मेट्रोकडून डेक्कन ते पुणे महानगर पालिका या भागातील नदीपात्रात प्रचंड राडारोडा टाकून मोठे भराव तयार केले जात आहे. यामुळे पुढे नदीचे पाणी वाढल्यास किंवा धरणातून पाणी सोडल्यास नदी काठालगतच्या पेठांमध्ये पूर येण्याची शक्यता, शिंदे यांनी व्यक्त केली.
काम थांबवण्याची मागणी
संबंधित प्रकार थांबवण्याबाबत त्वरित सूचना (स्टॉप वर्क नोटीस) संबंधित कंपनीस देण्यात यावी, अशी मागणी मनसेने मनपा आयुक्त व मुख्य अभियंता जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे केली आहे. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे उपशहर अध्यक्ष राम बोरकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा - नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई केल्याचा रागातून महिला पोलिसाला मारहाण