नवी दिल्ली/पुणे Meera Borwankar : माजी आयपीएस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र अजित पवार यांच्या कार्यालयानं बोरवणकर यांचे हे सर्व आरोप फेटाळले. त्यानंतर मीरा बोरवणकर यांनी सोमवारी (१६ ऑक्टोबर) राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेत, पुस्तकात जे काही लिहिलं आहे ते अगदी बरोबर असल्याचा दावा केला.
काय आहे प्रकरण : मीरा बोरवणकर यांनी सोमवारी दिल्ली प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील पोलीस ठाण्याची जागा बिल्डरला देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, 'पुस्तकात नमूद केलेली घटना १०० टक्के सत्य आहे', असंही त्या म्हणाल्या. मीरा बोरवणकर म्हणाल्या की, मी माझ्या 'मॅडम कमिशनर' पुस्तकात एका घटनेचा उल्लेख केला आहे. मी पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा ही घटना घडली. मला सांगण्यात आलं की, मध्य पुण्यात तीन एकर जमीन आहे. ती जमीन एका खाजगी बिल्डरला द्यायची आहे. त्यावर मी विचारलं की, ती का द्यायची? यावर मला, 'पोलिस ठाण्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बिल्डरची जागा असून तुमचं पोलिस स्टेशन मध्ये अडकलं आहे. तुम्ही पोलीस स्टेशन बाजूला करा आणि आणि ही जागा बिल्डरला द्या', असं उत्तर मिळालं. माझा मुद्दा होता की, पुणे पोलिसांना आवश्यक असलेली जमीन मी खासगी बिल्डरला का द्यायची, असं बोरवणकर म्हणाल्या.
पुस्तकात स्पष्ट उल्लेख : त्या पुढे म्हणाल्या की, 'अजित पवार यांनी मला कार्यालय बांधण्यासाठी जमीन हस्तांतरित करण्यास सांगितलं, पण मी याला नकार दिला. यानंतर महाराष्ट्राच्या गृहविभागानं बैठक बोलावली. बैठकीत सर्वांना विचारणा करण्यात आली आणि ही जागा पोलिसांकडेच राहणार, असा निर्णय घेण्यात आला. ही जागा आजही पोलिसांकडेच आहे', असं त्यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही जमीन वाचवली. त्यामुळे आता तपासाची गरज नाही. पुस्तकातही याचा उल्लेख केल्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांनी आरोप फेटाळले : अजित पवार यांनी पोलिसांच्या जमिनीचा लिलाव केला होता. ती जमीन नंतर परत मिळाल्याचा दावा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय. खासगी बिल्डरला जमीन देण्यासाठी अनेक प्रकारे दबाव टाकण्यात आला, मात्र आम्ही जमीन देण्यास स्पष्ट नकार दिल्याचं बोरवणकर यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलंय. विरोधक यावरून अजित पवारांना प्रश्न विचारत आहेत. अजित पवारांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा :