बारामती (पुणे) - केंद्र शासनाने सुरू केलेली आणि राज्य शासनाच्या मदतीने सुरू असलेली दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजना महिलांसाठी लाभदायक ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिला बचत गटातील महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनत असून त्यांचा आर्थिक स्तर वाढत असल्याचे सकारात्मक चित्र बारामतीत पाहावयास मिळत आहे. या योजनेतून स्वावलंबी झालेल्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.
सदर योजनेअंतर्गत बारामती नगरपालिका प्रशासनाला सन २०१५-१६ ते सन २०२०-२१( मार्चअखेर) या कालावधीत १६६ स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची स्थापना करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बारामती नगरपालिका प्रशासनाने या कालावधीत तब्बल १९१ स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना १८ लाख २० हजार रुपयांचा फिरता निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच, या कालावधीत ५०० लाभार्थींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सहा वर्षात सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्जवाटप
सदर योजनेअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये ६ महिला बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट असताना ८ बचत गट स्थापन करण्यात आले. यासाठी ८० हजार रुपयांचा फिरता निधी तर १ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. २०१६-१७ मध्ये १२ बचत गटांचे उद्दिष्ट होते. मात्र १४ बचत गट स्थापन करून त्यांना २० हजार रुपयांचा फिरता निधी तर, ३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ३० बचत गटांचे उद्दिष्ट असताना ४५ बचत गट स्थापन करण्यात आले. त्यांना २ लाखांचे खेळते भांडवल देऊन ३ लाख रुपयाचे कर्ज वाटप केले. तर २०१८-१९ मध्ये ४८ बचत गटांचे उद्दिष्ट पूर्ण करून त्यांना २३ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले. तसेच, २०१९-२० मध्ये ४७ गटांचे उद्दिष्ट असताना ५० बचत गट स्थापन करत ६ लाख ९० हजार रुपयांचा फिरता निधी देऊन ४४ लाख ७९ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले. २०२०-२१ मध्ये २३ महिला बचत गटांच्या स्थापनेचे उद्दिष्ट असताना २६ बचत गट स्थापन करत ३ लाख ५० हजार रुपयांचा फिरता निधी देत ७० लाख ४१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
सदर योजनेतून याचा मिळतो लाभ
शहरातील दारिद्र्याचे प्रमाण कमी करणे, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देणे, रोजगार, स्वयंरोजगार देणे, बचत गटांच्या माध्यमातून संघटित करून व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, दुर्बल घटकातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे व त्यांना स्वावलंबी बनविणे आहे. हाच मुख्य उद्देश दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेचा आहे.