पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या 5 व्या मजल्यावर आग लागली होती. इमारतीमध्ये अनेक कर्मचारी अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यात जखमी झालेल्या नागरिकांना सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. आगीमुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.दुपारी ही आग नियंत्रणात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग दुपारी नियंत्रणात आणली आहे.
शॉर्टसर्किटमुळे लागली आग - अग्निशामक दलाला माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जवानांनी सहा मजली असणाऱया इमारतीत प्रवेश करत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. आग ही इलेक्ट्रिक डक्टमधून पुढे पसरल्याने दुसरा ते पाचव्या मजल्यावर आगीची तीव्रता व धुराचे प्रमाण वाढत होते. जवानांनी इमारतीच्या काचा फोडून धुर बाहेर जाण्यास मार्ग करुन दिला. यावेळी आग ही इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे स्पष्ट झाले. दुपारी 12 वाजून 02 मिनिटांनी आग आटोक्यात आली.
कर्मचाऱ्यांना काढले सुखरुप बाहेर - आयटी पार्कमधे काम करणारे काही कर्मचारी आगीची घटना समजताच इमारतीमधून बाहेर पडले, तर काही कर्मचारी वर गच्चीवर गेल्याने अडकले होते. तसेच धुरामुळे ञास होत असल्याने अनेक कर्मचारी घाबरले देखील होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी उंच शिडीचे वाहन ब्रॉन्टोचा वापर करत कर्मचाऱ्यांना धीर दिला. यानंतर एकूण ५० कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर आणले. यादरम्यान अग्निशमन दलाचे अधिकारी कैलास शिंदे व तांडेल शफीक सय्यद हे काही प्रमाणात जखमी झाले, तर आयटी पार्कचे दोन कर्मचारीही किरकोळ स्वरूपात जखमी झाले. शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ च्या ०७ रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा