पुणे - कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असताना राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इतके दिवस बंद असलेले सर्वच उद्योगधंदे सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, लग्नकार्यासाठी लागणारे मंगल कार्यालय, लॉन्समध्ये फक्त ५० नागरिकांच्या उपस्थितीतच लग्न करण्याची परवानगी आहे. त्यामुळे, आता इतर सर्व गोष्टींना परवानगी दिल्यानंतर लग्नासाठी ५० व्यक्तींची मर्यादा का ? असा प्रश्न मंगल कार्यालयांच्या मालकांनी उपस्थित केला आहे.
७०० हून अधिक मंगल कार्यालये रिकामी
पुण्यात मंगल कार्यालय आणि लॉन्स असोसिएशन यांच्या अंतर्गत जवळपास ७५० मंगल कार्यालय आणि लॉन आहेत. यांचा सर्वाधिक वापर लग्नसमारंभासाठी होतो. सरकारने केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीतच लग्न पार पाडावे, अशी अट घालून दिलेली आहे. त्यामुळे, फक्त ५० नागरिकांसाठी मंगल कार्यालय भाड्याने का घ्यावे? असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडतो? म्हणून मंगल कार्यालये आणि लॉन्स रिकामे पडले आहेत.
लग्नकार्यावर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न
मंगल कार्यालय बुकिंग, सजावट, बँड, डीजे, सनई वाला, फेटेवाला, घोडेवाला यांचेही लग्नसोहोळ्यात महत्वाचे स्थान आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून मंगल कार्यालये सुनी पडल्यामुळे सदर व्यावसायिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
करापोटी महापालिकेला लाखो रुपये द्यावे लागतात
मंगल कार्यालयाकडून महानगरपालिकेला करापोटी लाखो रुपये द्यावे लागतात. कोरोना काळात जरी हे मंगल कार्यालय बंद असले, तरी त्यांना हा कर भरावाच लागला आहे. वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार, मेंटेनन्स खर्च याचासुद्धा भार मंगल कार्यालयाच्या मालकांना सोसावा लागला. यानंतरही मंगल कार्यालय मालकांची सरकार विषयी कुठलीही तक्रार नाही, की त्यांनी कधी यासाठी आंदोलन केले नाही. फक्त ५० टक्के क्षमतेने मंगल कार्यालये सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कार्यालय व्यावसायिकांनी सरकारकडे केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन
पुण्यातील मंगल कार्यालय आणि लॉन्स असोसिएशनच्यावतीने ५० टक्के क्षमतेने मंगल कार्यालय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी राज्य सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भातले निवेदनही देण्यात आले आहे. त्यामुळे, मंगल कार्यालय असोसिएशनच्या या मागण्यांवर सरकार कशाप्रकारे तोडगा काढेल हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा - दौंड तालुक्यातील पारगाव येथून एटीएम मशीनची चोरी