पुणे - जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगल कार्यालयात जाऊन वऱ्हाडी मंडळीचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या नवरा-बायकोच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. विलास मोहन दगडे आणि त्याची पत्नी जयश्री विलास दगडे, असे या भामट्या चोरांची नावे आहेत.
या नवरा-बायकोने गेल्या आठ महिन्यांमध्ये तब्बल 17 ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. पुणे पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 92 तोळे सोने, 50 हजाराहून अधिक रोख रक्कम, दहा मोबाईल सेट, तसेच एक चार चाकी गाडी, असा एकूण 37 लाख 27 हजार 430 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे दोघे नवरा-बायको सध्या खुळेवाडी चंदननगर येथे राहत होते.
नवरा-बायकोची जोडी ही सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी वडार गल्ली येथील आहे. पती-पत्नी मोलमजुरीच्या कामासाठी पुण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी लग्नात जाऊन वऱ्हाडी मंडळीची नजर चूकवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमांवर हात साफ करायला सुरुवात केली होती.
ज्या ठिकाणी हे दोघे नवरा-बायको राहायला होते. तेथील काही जणांना त्यांच्या राहणीमानात गेल्या काही महिन्यांत मोठा बदल दिसून आला. यात काहीतरी गडबड आहे, अशी शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसांना यासंबधी माहिती दिली. त्या आधारावर पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली.
याच दरम्यान सासवड येथील सरस्वती मंगल कार्यालयात ते दोघे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे या मंगल कार्यालयातून चोरून आणलेला आयब्रोज आढळून आला. त्यांची अधिक तपासणी केल्यानंतर या दोघांनी गेल्या आठ महिन्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
चोरी कशा प्रकारे करायचे?
हे दोघे नवरा बायको परिसरातील मंगल कार्यालयात जाऊन तिथे कुणाचे लग्न आहे, याची माहिती घेत होते. याचबरोबर मंगल कार्यालयात लिहिलेल्या बोर्डावरची नावे वाचून ते त्या ठिकाणी जात होते. लग्नात नवरदेव मंडळींनी विचारलं तर नवरीकडचे आहोत, असे सांगत तर नवरीकडच्या मंडळींनी विचारले तर नवरदेवाकडचे आहोत, असे सांगून ते लग्नात शिरकाव करत होते.
संबंधित आरोपी हे अतिशय थाटामाटात लग्नात जात असल्याने शक्यतो त्यांच्यावर कोणीही संशय घेत नव्हते. मात्र, एक-दोन ठिकाणी त्यांना पकडण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी शिताफीने उत्तर देत सुटका केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या दोघांनी चोरीच्या पैशातूनच स्विफ्ट कार खरेदी केली होती. याच पैशातून त्यांना पुण्यामध्ये फ्लॅट देखील खरेदी करायचा होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. या १७ गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून यासंबधी अधिक चौकशी करण्यात येत आहे.