पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसरा सणाला झेंडूच्या फुलांचे बाजारात आगमन झाले असून, झेंडूला प्रति किलो शंभर ते दीडशे रुपये बाजार भाव मिळत आहे. असा उच्चांकी बाजारभाव मिळूनही शेतकरी तोट्यातच असून परतीच्या पावसामुळे पन्नास ते सत्तर टक्क्यांहून अधिक झेंडू पीक शेतातच खराब झाले आहे. त्यामुळे, झेंडूला बाजारभाव मिळूनही शेतकरी तोट्यातच आहे.
लॉकडाऊन नंतर चक्रीवादळ आणि आता परतीचा पाऊस, यामुळे झेंडू शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. मात्र, यंदा नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी हे सण झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी आशा असताना परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला झेंडू काळा पडून खराब झाला. त्यामुळे, बाजारात झेंडूची आवक कमी झाल्याने झेंडूला प्रति किलो १०० ते १५० बाजारभाव मिळत आहे. शिल्लक राहिलेल्या झेंडूला सध्या चांगला बाजारभाव मिळत असल्याने उत्पादन खर्च मिळेल, अशी शेतकऱ्याला आशा आहे. मात्र, या वर्षी झेंडूतून नफा मिळणार नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सनीविरोधात गुन्हा दाखल; पत्नीला मारहाण केल्याची तक्रार