पुणे Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मात्र, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार अजूनही ठोस भूमिका घेत नसल्यानं त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या अनेक भागात उमटताना दिसत आहेत. दरम्यान, पुण्यातील डीपी रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, तसंच वंचित विकास संस्थेच्या वतीनं ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ या उपक्रमाचं आयोजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमाला उदय सामंत आले नाहीत.
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी : कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या बाहेर लावलेलं उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं फ्लेक्सही आंदोलकांनी फाडलं. त्यामुळं काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पुणे मार्केट यार्ड बंद : मराठा आंदोलक राज्यात आक्रमक झाले असून काही ठिकाणी हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच आंदोलकांनी लोकप्रतिनिधींना लक्ष्य केल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील कामगार संघटनेनं एक दिवस बाजार बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नागरे म्हणाले, "मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 8 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बैठक घेतली असून बाजार एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला."या मार्केटची रोजची उलाढाल 15 ते 20 कोटी रुपये आहे", असं संतोष नागरे यांनी सांगितलंय.
आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीत सर्वच नेत्यांनी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं नाराजी व्यक्त केलीय. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं असं अवाहन करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाच्या नेत्यांसह विरोधी पक्षनेते उपस्थित होते. या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला असून सर्व नेत्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.
आरक्षणाबाबत सर्वांचं एकमत : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतरच टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकतं, त्या दृष्टीनं राज्यातील सर्व पक्ष एकत्र काम करण्यास तयार आहेत, असं शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Manonj Jaragne Patil News: मराठ्यांना आतापर्यंत सर्वांनी फसवलं, आजपासून पाणीही सोडणार - मनोज जरांगे
- Maratha Protest : मराठा आरक्षणाचं लोन मंत्रालय आणि विधानभवनापर्यंत; दगाफटका होण्याची शक्यता - सुप्रिया सुळे
- MLAs Agitation at Mantralaya : मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला ठोकलं टाळं, आमदारांना नेलं पोलीस स्थानकात!