पुणे - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आज पुण्यातील विविध पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी, सारथी संस्थेची मुस्कटदाबी बंद करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांविषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी डेक्कन जिमखाना येथील शिवसेना पक्षाचे कार्यालय, भारतीय जनता पक्षाचे कार्यालय आणि सर्वात शेवटी शिवाजीनगरच्या काँग्रेस भवन येथे आंदोलने केली. काँग्रेस भवन येथे आमदार संजय जगताप यांनी मराठा समाजातील प्रश्नांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देणारे लेखी आश्वासन मराठा क्रांती मोर्चातील नेत्यांना दिले.
सर्व राजकीय पक्ष विधिमंडळात विविध धोरणे ठरवतात. त्याचा समाजावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. मराठा समाजातील लोकांच्या बँका, शिक्षण संस्था, साखर कारखाने, आमदार खासदार यांच्याकडे पाहून आरक्षणाची गरज नसल्याचे प्रतिपादन विरोधकांकडून केले जाते. त्यामुळे जे मराठा समाजाला आरक्षण नाकारत आहेत, त्यांच्या दारावर जाऊन निदर्शने करण्याचा आमचा हा मानस आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.