पुणे Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला दिलेली ४० दिवसाची मुदत संपल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन पाठिंबा सुद्धा देत आहे. पुण्यात देखील मराठा क्रांती मोर्चानं मनोज जरांगे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आलेली आहे.
राजकीय नेत्यांना बंदी : मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली मुदत संपली असून ते उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहासमोर हे साखळी उपोषण मराठा समाज बांधवांनी सुरू केलं आहे. त्याचबरोबर 28 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजीनगर ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा डेक्कन इथपर्यंत 'मेणबत्ती मोर्चा' काढण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक गावात मराठा नेत्यांना आरक्षणाशिवाय येऊ नये यासाठी गाव बंदीचे आदेश काढण्यात आलेले आहेत. तसे बॅनर लावलेले आहेत तसे बॅनर पुण्यात सुद्धा लावण्यात येतील. त्याची सुरुवात सिंहगड रस्त्यावरून जी जुनी गावे आहेत त्याठिकाणी करणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणं शक्य आहे. बापट आयोगामधील काही सदस्यांनी ती आकडेवारी सांगितलेली आहे. सरकार वेळखाऊपणा करत आहे. सरकारला द्यायची इच्छा नाही त्यामुळे हे सगळं होत असल्याची प्रतिक्रिया, मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कुंजीर यांनी दिली. सरकारने संवाद साधून यातून मार्ग काढून ओबीसीसी संवाद साधून मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे. त्यासाठी जो आमचा लढा सुरू आहे तो सुरूच राहील. आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. तसंच उद्यापासून पुणे जिल्ह्यातसुद्धा मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -