पुणे - राज्यात सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. मोठ्या संख्येने कोरोनाबाधित सापडत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनची प्रचंड कमतरता आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे प्राण गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ऑक्सिजनची ही समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योजकांची संस्था असलेल्या 'मराठा चेंबर्सऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर'ने (MCCIA) यासाठी पुढाकार घेतला असून 'मिशन वायू' हा उपक्रम सुरू केला आहे.
हेही वाचा - करंदीमध्ये किराणा मालाच्या दुकानातून दारू विक्री
संस्थेच्या वतीने सिंगापूर येथून तब्बल चार हजार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मागविण्यात आले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत मोफत पोहोचवले जात आहेत. एक ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हा एका ऑक्सिजन सिलेंडरचे काम करतो. त्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर किती उपयुक्त ठरू शकतो याची कल्पना सर्वांना आली असेल. इतक्या मोठ्या संख्येने ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पुण्यात येणे ही महाराष्ट्रातली पहिलीच घटना असल्याचे एमसीसीआयएचे पदाधिकारी प्रशांत गिरबाने यांनी सांगितले.
असा काम करतो ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरला वेगळा गॅस सिलेंडर पुरवण्याची गरज नसते. हे मशीन हवेतून ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातून नायट्रोजन बाजूला करून शुद्ध स्वरुपातील ऑक्सिजन रुग्णाला देते. हे मशीन अतिशय छोटे आणि पोर्टेबल स्वरुपाचे आहे. त्यामुळे, पटकन कुठेही शिफ्ट करता येते. त्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत याची उपयुक्तता खूप आहे.
प्रशांत गिरबाने म्हणाले, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या सभासदांनी या उपक्रमासाठी कोटी रुपये दिले आहेत. त्यातून आमच्याकडे मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आणि आम्ही मिशन वायू हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही 4 हजार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मागवले आहेत. हे सर्व ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पुण्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोहचवले आहेत.
गिरबाने म्हणाले, एक संस्था या नात्याने आमचा वेगवेगळ्या देशांशी संपर्क असतो. त्याचा वापर करून आम्ही कमी किमतीत या मशीन मिळवू शकतो. चांगल्या गुणवत्तेच्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची किंमत 70 ते 75 हजार असेल तर आम्हाला तो अर्ध्या किमतीत मिळू शकतो. सिंगापूरमधील एका कंपनीने आम्हाला ते डिस्काउंटमध्ये दिले आहेत. शिवाय ॲमेझॉन कंपनीच्या मदतीने त्यांच्या विमानातून हे सर्व ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भारतात मोफत आणण्यात आले आहेत. भारतात आणण्यासाठी अनेकांचा हातभार लागला. त्यामुळे, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत आम्ही हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मोफत देऊ शकलो.
हेही वाचा - पुणे जिल्ह्यात मागणीच्या प्रमाणात निम्म्यापेक्षा कमी रेमडेसिवीर उपलब्ध