बारामती : मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत घरच्यांना फोनवरुन कल्पना दिली होती. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, 'बाबा... हिंसाचार खूपच वाढलाय... सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत... कोणत्याही क्षणी माझ्या हॉस्टेलवरही हल्ला होऊ शकतो... कदाचित हे माझे शेवटचे बोलणे असेल...' अशा भयंकर संवादाचा फोन मणिपूर राज्यातील इंफाळ येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणाऱ्या आवंडी गावात त्याच्या वडिलांना संभाजी कोडग यांना आला. हे ऐकून कोडग यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कोडग यांनी तात्काळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तेथील राज्यपालांना कळवले आणि जलद गतीने सूत्रे हालली आणि मुले सुखरूप सुरक्षित ठिकाणी दाखल झाली.
मणिपूर येथील इंफाळ येथे आदिवासी आणि बिगर आदिवासी या दोन समुदायांमध्ये अनुसूचित जमातीच्या दर्जाबाबत संघर्ष पेटला आहे. ४ मे रोजी मोर्फाचे बारामती येथील पदाधिकारी प्रल्हाद वरे यांना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मोर्फाचे सदस्य असलेले संभाजी कोडग यांचा फोन आला.
त्यांचा मुलगा आय.आय.टी. (IIT) इंफाळ, मनिपूर येथे शिक्षणासाठी आहे. सध्या तो त्याचे महाराष्ट्रातील दहा मित्र व इतर राज्यातील दोन असे बारा मित्रांसह होस्टेलमध्ये आहे. होस्टेल शेजारी व मणिपूरमध्ये ठिकठिकाणी कुक्की व मेथी या दोन समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू आहे. होस्टेलच्या चोहोबाजूंनी बाॅम्बस्फोट व गोळीबार चालू होता. कोडग म्हणाले काहीही करा. माझ्या मुलाला व त्याच्या मित्रांना वाचविण्यासाठी प्रयत्न करा, मला मुलाचा फोन आलाय की हा माझा कदाचित शेवटचा फोन असेल. परत फोन करण्यासाठी मी जिवंत राहतो की नाही ते मला सांगता येणार नाही,असे कोडग यांनी सांगितले.
वरे कोडग यांना म्हणाले की, आपण उद्या सकाळी मुंबईला ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचेकडे जाऊ, परंतु कोडग म्हणाले एवढा वेळ नाही. कधीही होस्टेलवर हल्ला होऊ शकतो. वरे यांनी पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वीय सहायक यांचे संपर्क क्रमांक दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राऊत यांनी कोडग यांचा फोन घेतला व सर्व माहिती घेतली व लगेच शरद पवार यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मणिपूरचे राज्यपाल यांना फोन करून महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मुलांना सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सांगितले. राज्यपालांना कळविल्यामुळे एकदम वेगवान सुत्रे हलली. रात्री बारा वाजता मणिपूर मिल्ट्रीचे चिफ कमांडर यांचा हिंसाचारात अडकलेल्या मयुर कोडग या विद्यार्थ्याला फोन आला की आम्ही तुम्हाला संरक्षण दिले आहे. काही काळजी करू नका. सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी लवकरच येत आहोत असे सांगून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
ज्येष्ठ नेते शरद पवार,विरोधी पक्ष नेते अजित पवार,खा. सुप्रिया सुळे त्यांच्यामुळे आमच्या मुलांना जीवनदान मिळाले. खरच राज्यातील जनतेला जगाच्या पाठीवर कुठेही संकट व अडचण आली,तरी पवार साहेब ती अडचण पक्षाचा आहे की विरोधक आहे असे कधीही न पाहता ती अडचण सोडवतात,पवार साहेब यांच्यावर वर हाच मोठा विश्वास महाराष्ट्रा बरोबर भारतातील जनतेचा पण आहे.असे संभाजी कोडग यांनी सांगितले.