पुणे - गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये बदल केल्यास विसर्जनाची मिरवणूकच रद्द करू, असा इशारा पुण्यातील मानाच्या गणपती मंडळाच्या शिष्टमंडळाने पोलिसांना दिला आहे. परंपरेप्रमाणे सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरक्षेबाबत बदल केल्यास गणपतीच्या मूर्तीचेही विसर्जन करणार नसल्याचीही भुमिका मंडळाने घेतली आहे.
हेही वाचा - अबब... घरात चोरी करणारा निघाला पत्नीचा फेसबुक फ्रेंड
पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहिले नाही. मिरवणुकीच्या परंपरेमध्ये जर बदल झाला तर विसर्जन केले जाणार नाही. असे झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सव मिरवणूक परंपरेला गालबोट लागेल असा, इशारा या मानाच्या प्रमुख गणेश मंडळांनी दिला आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम तुळशीबाग आणि केसरीवाडा गणेश मंडळ यांच्याकडून पोलिसांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
शहरात गणपती विसर्जन मिरवणूक नीट पार पाडावी, यासाठी 126 वर्षांपूर्वी प्रमुख मंडळांनी विसर्जन मिरवणुकीचा क्रम ठरवलेला होता. या परंपरेला छेद देण्याची चर्चा पोलिसांकडून होत असल्याचे दिसत होते. गणेश मंडळींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र पोलीस प्रशासन यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.