पुणे - किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाने आपली होणारी पत्नी आणि तिच्या आईवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर, मुलीची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या गणेश पेठ परिसरात घडली.
नाझनीन सादिक शेख ( वय 18) असे मृत मुलीचे नाव आहे. तर हमीदा सादिक शेख ( वय 45) असे जखमी आईचे नाव आहे. आरोपी शरीफ रझाक शेख ( वय 18) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.
नाझनीन आणि शरीफ यांचा विवाह होणार होता. पण त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी शरीफ याने नाझनीन आणि हमीदा यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने नाझनीनचा मृत्यू झाला. अशी माहिती फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नावंदे यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. त्याने हा जीवघेणा हल्ला का केला याचा तपास पोलीस करत आहेत.