पुणे- 'ड्राय डे’ च्या दिवशी ऑनलाइन दारू खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीला ५० हजार रुपयांनी गंडवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथे घडली आहे. पियाली दुलाल कर (व.३२, रा. बावधन) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 'ड्राय डे' होता. अश्या वेळी फिर्यादी यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास घुले वाईन शॉप यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून दारूची मागणी केली. तेव्हा, आज 'ड्राय डे' असल्याने ऑनलाईन बुकींग करा, आपल्या पत्त्यावर दारू मिळेल, असे फोनवरून एका अज्ञात व्यक्तीने सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने ओटीपी नंबर शेअर केला असता, दोन टप्प्यात पैसे काढून घेण्यात आले. त्यांच्या बँक खात्यातून एकून ५० हजार ७७८ रुपये काढून घेतले गेले. दारू तर मिळाली नाही मात्र, ५० हजारहून अधिक रुपयांचा गंडा घातला गेला. अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- 39 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे पुण्यात आयोजन