पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यांपासून देशातील सर्व मॉल बंद ठेवण्यात आले होते. मात्र, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू मिळाव्यात, यासाठी बुधवारपासून पुण्यातील सर्व मॉल खुले करण्यात आले आहे.
सरकारने मॉल सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे येथील सर्वांनी स्वागत केले आहे. खबरदारी म्हणून येणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सॅनिटायझर वापरण्यात येत आहे. तसेच ग्राहकांचे तापमानही तपासले जात आहेत. यासोबतच सर्व मॉलचालकांनी ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक केले आहे. मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, फेस शिल्ड देण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी प्रत्येक स्टँडला सॅनिटायझ करणे आणि वेळोवेळी स्वच्छ करणे, यावर भर देण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे पतीचे निधन, औरंगाबादमध्ये महिलेने मुलांसह केली आत्महत्या
ज्येष्ठ नागरिकांना मॉलमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आम्ही होम डिलिव्हरी सुरु केली आहे. तसेच ट्रायल रूम आणि रिप्लेस बंद करण्यात आले आहे, अशी माहिती पुण्यातील नावी पेठेतील सेंट्रल मॉलचे स्टोर मॅनेजर प्रीतम पपानी यांनी दिली.
शहरातील बहुतांश व्यवहारांची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत होत आहे. सुरक्षितपणे नियम पाळत नागरिकांची बाहेर पडण्याची मानसिकता निर्माण होताना दिसत आहे. मॉलमध्ये पहिल्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद अल्प असला तरी पुढील काही दिवसांत त्यामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.