पुणे - बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्यावर आर्थिक अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज (मंगळवार) माळेगावमध्ये ग्रामस्थांकडून बंद पाळण्यात आला आहे.
हेही वाचा - पुण्यातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन; मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप
तावरे यांनी पतसंस्थेचे सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांच्या संगनमताने ५१ लाख ३० हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा बारामती तालुका पोलिसात दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, २०११ मध्ये शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांनी संगनमत करून सुरेश खलाटे, रामदास आटोळे (खांडज), राजेंद्र तुकाराम बुरुंगले (माळेगाव बुद्रुक) या तिघांच्या कर्जमागणी प्रकरणी कोऱ्या धनादेशावर सह्या घेतल्या आहेत. त्यांच्या प्रत्येकी १७ लाख १० हजार रुपये असे एकूण ५१ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखवले. तसेच सदर रक्कम रोखड (बेअरर) चेकद्वारे आमच्या परस्पर काढून घेतली असल्याचे सुरेश तुकाराम खलाटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
त्यामुळे माळेगावच्या कार्यक्षेत्रातील १३ गावात शेतकरी सहकारी पॅनेलच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासून तणावाच्या वातावरणात बंदला माळेगावकरांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला आहे. व्यापाऱ्यांनी देखील आपआपली दुकाने बंद ठेवत या बंदला पाठिंबा दिला. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.