बारामती (पुणे) - तालुक्यातील सर्वात मोठ्या माळेगाव ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीत रूपांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली असून तब्बल तीन महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून राज्यातील १३ ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये रूपांतरीत करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने तीन महिन्यांनंतर या नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याची प्रक्रिया सुरू
एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचाही यामध्ये समावेश होता.परंतु या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे माळेगावसह राज्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणूका रद्द करण्याबाबत नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे.या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तीन महीने पुढे ढकलाव्यात असेही निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
माळेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत
माळेगाव ही बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. महिनाभरावर निवडणूक आल्याने अनेकांनी निवडणुकीची जोरदार तयार केली होती. मात्र काल नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रांमध्ये माळेगावचाही समावेश असल्याने अनेक इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी पडले आहे.