पुणे - महाशिवरात्री हा उत्सव नागरिकांसाठी महत्त्वाचा असून राज्यातील येणाऱ्या संकटांवर मात करण्याची ताकद मिळो, अशी भीमाशंकर चरणी प्रार्थना करून पुढे जात आहे, पुढील काळात काम करण्याची ताकत मिळावी अशी भीमाशंकर चरणी प्रार्थना कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. ते आज भीमाशंकर येथे शासकीय महापूजा व अभिषेक करण्यासाठी आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत होते. महाशिवरात्रीनिमित्त आज सर्वत्र शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भीमाशंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
आज शासकीय महापूजेद्वारे भीमाशंकर शिवलिंगावर अभिषेक कार्यक्रम पार पडला. राज्यात अनेक अडचणींचा सामना सध्या नागरिक करत आहेत, त्यामुळे या संकटांवर मात करण्याची ताकत महाविकास आघाडीला मिळावी व सामान्य नागरिकांचे प्रश्न योग्य पद्धतीने सोडविण्यात मदत व्हावी अशी प्रार्थना वळसे-पाटील यांनी केली.
हेही वाचा - महाशिवरात्रीचा उत्साह : घृष्णेश्वर येथे भाविकांची गर्दी, मंदिर परिसरात जवळपास 300 पोलीस तैनात
भीमाशंकर विकास आराखडा अडचणीच्या संकटातून जात आहे. वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व इतर शासकीय परवानग्या घेऊन नागरिकांना व भाविकांना भीमाशंकर येथे योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पुढील काळामध्ये हा विकास आराखडा योग्य पद्धतीने तयार करून भीमाशंकरचा जंगल परिसर सुसज्ज करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भीमाशंकर मंदिर परिसर हा जंगल परिसर असून येथे भाविकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देताना मोठ्या अडचणींचा सामना देवस्थान व प्रशासनाला करावा लागत आहे. परिणामी याचा त्रास काही प्रमाणात भाविकांना सहन करावा लागत आहे. मात्र, पुढील काळात भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून भाविकांसाठी सर्व सुख-सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सांगितले.
हेही वाचा - 'या' निर्णयामुळे १० लाख लोकांवर अन्याय, काका-पुतण्याचे खरे चेहरे जनतेसमोर'