पुणे : सासरच्या मंडळींनी सुनेला पाळीतील रक्त जमवण्यास भाग पाडले. ते 50 हजार रुपयांना मांत्रिकाला विकले. सुनेचे हातपाय बांधून रक्त जमा करत झालेल्या या प्रकाराची तक्रार सामाजिक संस्थेच्या मदतीने सदर महिलेने केली. या प्रकारानंतर सहभागी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 वर्षीय पीडित महिलाही पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहत आहे. दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि आरोपीचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर पीडित महिलाही तिच्या सासरी बीड या ठिकाणी राहण्यास गेल्यानंतर, हा सर्व प्रकार घडला आहे.
धर्माच्या नावाखाली केले जाणारे शोषण : यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानिमित्ताने मासिक पाळीशी निगडीत अंधश्रद्धा नव्याने पुढे येत आहेत. तसेच पाळीच्या काळात महिलांना चागली वागणूक मिळते का? हा प्रश्न ही पुन्हा उपस्थित होतो. तज्ञाच्या मतानुसार मासिक पाळीतील रक्त हे रक्त व मांसपेशींचे अस्तर असते, जे गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर फेकले जाते. याचा अशुद्धता, अपवित्रता किंवा पवित्रता याच्याशी कसलाही संबंध नसतो. गर्भाशय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाळी येते, मग ती कोणत्याही देशातील, जातीतील, धर्मातील असो. त्याचा संबंध कोणत्याही एका धर्मासोबत जोडणे आणि त्याआधारे कोणतेही धार्मिक विधी करणे किंवा धार्मिक विधी करायला मज्जाव करणे, हे दोन्ही ही धर्माच्या नावाखाली केले जाणारे शोषण आहे.
विकृत आणि अमानवी वागणे : पाळीच्या रक्ताचा वापर करून जादू्टोणा करणे, ही तर दुहेरी फसवणूक आणि दंडनीय गुन्हा आहे. पाळीच्या काळात महिलेला सकस आहार, पुरेसा आराम, स्वच्छता आणि सकारात्मक वागणूक मिळणे, हा प्रत्येक महिलेचा मानवाधिकार आहे. या चारही बाबींचे उल्लंघण वरील प्रकारात घडलेले आहे. ज्या काळात तिला आराम मिळाला पाहिजे, त्या काळात तिचे हातपाय बांधणे, रक्त जमा करण्यासाठी तिच्या शरीरासोबत छेडछाड करणे, हे विकृत आणि अमानवी वागणे आहे. धर्माच्या नावाने व पैशांच्या प्रलोभनातून घडलेल्या या घटनेचा निषेध करत आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली, तर अशा प्रकरणांना काही प्रमाणात आळा बसेल. अशी भावना आता समाजातून निर्माण होत आहे.
समाजासाठी चिंतेची बाब : सर्व प्रकाराची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. दोषीवर कारवाई करणार असल्याची माहिती, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली पाटील चाकणकर यांनी दिलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्र आणि सांस्कृतिक पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली असे कार्य होत असेल, तरी समाजासाठी चिंतेची बाब आहे. त्यासाठी राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करू. त्या महिलेला न्याय देणार असल्याचे महिला अध्यक्षा रूपाली पाटील चाकणकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Palghar Crime : किरकोळ वादानंतर मुलाने केली आईची हत्या; नात्याला काळीमा फासणारी घटना