पुणे: हवामान विभगाच्य अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा मालदीव ते मध्य महाराष्ट्र पर्यंत असून दक्षिण पूर्व अरबी समुद्रात व कर्नाटक किनारपट्टी मधून जात आहे. हीच स्थिती पुढील दोन दिवस अशी राहणार असून राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमानात किंचित वाढ आणि किमान तापमान सरासरी इतके असणार आहे. मराठवाड्यात दोन दिवस तर विदर्भात तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. म्हणजेच याठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व गारा पडण्याची शक्यता आहे. तर पुण्यात देखील मेघगर्जनेसह विजांच कडकडाट व गारा पडण्याची शक्यता आहे.
आठवडाभर मेघगर्जनेसह पाऊस: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण गोवा या ठिकाणी पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्यमहाराष्ट्र येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भ येथे देखील पुढील आठवडाभर गारा पडण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील विविध भागात अवकाळी: राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आज दुपारी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली होती. यामध्ये पातुर तालुका, बार्शीटाकळी तालुक्यात गारपीट झाली होती. दरम्यान, या गारपिटीमुळे कोठेही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ : याआधीही अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या गारपीटीने शेतातील संत्रा, लिंबू, कांदा आंबा पिकाला फटका बसला आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. अवकाळी पावसात 15 दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला होता. त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रांना बसला. कामगारांचा संप मागे घेतल्यानंतर नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, त्या सर्व नुकसानीच्या भरपाईचे आदेश अद्यापही न मिळाल्याने शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात आजच्या अवकाळी पावसाने भर घातली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दोन्ही नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. तूर तालुक्यातील तुळंगा, बार्शीठकाळी या भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले होते.
हेही वाचा: Rain Update राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस ग्रामीण अकोल्यात गारा बरसल्या