पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये देखील फूट पडली आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांवर मुख्यमंत्री पदासाठी बंड केल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले की, जे विचार अजित पवार 35 वर्षांपासून जपत आले आहेत, ते विचार घेऊनच ते मुख्यमंत्री झाले असते. ते विरोधी पक्ष नेते व्हावे यासाठी मी देखील पाठिंबा दिला होता, असेही रोहित पवार म्हणाले. राज्यात भाजप विरोधी वातावरण असताना ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. पण आता जर ते मुख्यमंत्री झाले तर मी पुतण्या म्हणून त्यांचं स्वागत करेन, पण नागरिक म्हणून स्वागत करणार नाही, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.
'हे भाजपनेच घडवून आणलं आहे' : अजित पवारांसोबत बंड करणारे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवारांवर कडाडून टीका केली आहे. याला आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'माझं वय कमी असलं तरी भूमिका घेण्यासाठी वयाचा संबंध नाही. ४० वर्षे शरद पवारांसोबत राहूनही त्यांची विचारसरणी कळली नसेल तर चूक कोणाची आहे?, असा सवाल त्यांनी दिलीप वळसे पाटलांना केला. शिवसेनेनंतर आत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील पक्षावरून वाद सुरू झाला आहे. यावर रोहित पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला हेच पाहिजे होते. हे त्यांनीच घडवून आणले आहे. याला आमचे काही लोक बळी पडत आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
'विचारसरणीची वेळ आली तेव्हा सोडून गेले' : छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावर रोहित पवार म्हणाले की, त्यांनी जर गौप्यस्फोट केले तर आम्ही देखील त्याला उत्तर देऊ. शरद पवारांनी विश्वासाने काही लोकांना ताकद दिली होती. त्याचा वापर त्या लोकांनी व्यक्तिगत हितासाठी केला. परंतु जेव्हा विचारसरणीची वेळ आली तेव्हा ते शरद पवारांना सोडून गेले, अशी टीका त्यांनी केली. आज ते सर्व माझ्याबद्दल बोलत आहेत. मला जर ते इतकं महत्त्व देत असतील तर चांगली गोष्ट आहे, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
'..तर तुमचं होत्याचं नव्हतं होईल' : सदाभाऊ खोत यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी, उगाच रांगडी भाषा वापरून हीरो बनू नका. आम्ही जर ही भाषा वापरली तर तुमचं होत्याचं नव्हतं होईल, असा इशारा दिला आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार लढत होणार अशी चर्चा आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले की, भाजपने कितीही ताकद लावली तरी पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढणार नाहीत. कुटुंबाच्या बाबतीत काहीही झालं तरी अजित पवार वेगळी भूमिका घेणार नाहीत, असे ते म्हणाले. तसेच बारामती विधानसभा मतदार संघात अजित पवारचं जिंकणार असल्याचेही रोहित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा :