पुणे : 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (Maharashtra Kesari wrestling tournament) आजपासून पुण्यात रंगणार आहेत. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी आक्षेप घेतला होता. ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मात्र आयोजकांनी ही स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा केला आहे. (Maharashtra Kesari Pune)
आज 6 वाजता उद्घाटन : आजपासून ही स्पर्धा 14 तारखेपर्यंत पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच पैलवानांच्या डोपिंगचा मुद्दा चर्चेत आला होता. अशातच या स्पर्धेतील मानाची गदा कोणाच्या खांद्यावर असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती 'महाराष्ट्र केसरी'चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
अशी असेल व्यवस्था : 65 व्या महाराष्ट्र केसरीच्या तयारीचा आढावा आणि भव्य मैदानाची पाहणी केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी यंदाच्या स्पर्धेची माहिती दिली. कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. भव्य 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली आहे. त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. 20 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे. पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राजकारण आणू नये : गेल्या अनेक दिवस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या कुस्ती स्पर्धेचे आमंत्रण आल्यानंतर विचार करू, असे वक्तव्य केले होते. यावर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ही स्पर्धा खुली आहे आणि त्यांनी त्याचा आनंद घ्यावा खेळामध्ये राजकारण आणू नये. राजकारणात खेळ चालतो खेळामध्ये राजकारण चालत नाही.
स्पर्धेला डोपिंगचे ग्रहण : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. मात्र त्याआधीच कुस्तीच्या आखाड्याला डोपिंगचं ग्रहण लागले की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सोलापुरातून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीमुळे डोपिंगचे प्रकरण समोर आले आहे. सोलापुरात 8 हजार मेफेन टरमाईनचे इंजेक्शन पैलवानांना विकल्याची अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली होती. दरम्यान, पोलीस भरतीला आलेल्या उमेदवारांनीही मेफेन टरमाईनची इंजेक्शन्स घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे डोपिंग प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामागच्या मास्टरमाईंडला पकडण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे.