पुणे - कोरोनामुळे बंद असलेल्या शहरातील साडे तीन हजाराहून अधिक जिम, हेल्थ क्लब आता दसऱ्याच्या मुहुर्तावर पुन्हा सुरू झाले आहेत. आर्थिक कारणांमुळे जिमचालकांसमोर अनेक अडचण निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे. महामारीत राज्य सरकारने केंद्र सरकारकडून आलेल्या सुचनानुसार अत्याधुनिक जिम, पारंपारीक व्यायामशाळा, हेल्थ क्लब आदी बंद करणे बंधनकारक केले होते.
गेल्या दोन महिन्यापासून जिम चालकांकडून जिम पुन्हा सुरू करू द्या, अशी मागणी राज्य सरकारकडे केली जात होती. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने निर्णय घेत 25 ऑक्टोबरपासून जिम, व्यायामशाळा, हेल्थ क्लबची दारे पुन्हा उघडण्यास सशर्त परवानगी दिली. आजपासून जीम पुन्हा सुरु झाले आहेत. जीममधील साहित्याचे सॅनिटाजेशन, साफसफाई, देखभाल दुरुस्ती, अशी सर्व खबरदारी जिममध्ये घेतली जात आहे. पुणे शहरात आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या जिम साखळीच्या अनेक शाखा आहेत.
अनेक शरीरसौष्ठवपटूंनी उभारलेल्या जिम, अनेक संस्थांच्या व्यायामशाळा अशा सुमारे साडे तीन हजाराहून अधिक जिम शहरात असुन, कोरोनाच्या कालावधीत त्या बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. शहरातील सुमारे 200 ते 300 जिम या बंदच झाल्या असुन, त्यापैकी दिडशे ते दोनशे जिम या चालविण्यासाठी देण्याचे प्रस्ताव काही जिम व्यावसायीकांनी दिले आहेत.
येत्या काळात जिम व्यवसाय पुर्वपदावर आणण्याचे आव्हान मालकांसमोर उभे ठाकले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिममध्ये येऊन व्यायाम करणाऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, यावर त्यांचे आर्थिक गणित अवलंबून राहणार आहे.
राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार जिम सुरू करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी बॅच तयार केल्या जाणार आहेत. यामुळे जिममध्ये येणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी होईल. त्याचा परीणाम व्यवसायावर होणार आहे. तसेच ग्रुप अॅक्टीव्हीटी करता येणार नाही. आर्थिक घडी बसविण्यासाठी जिम चालू करण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती पुणे फिटनेस क्लब असोसिएशनचे अध्यक्ष निलेश काळे यांनी दिली.