पुणे - कोरोना परिस्थितीत गरोदर महिला, कुपोषित बालके यांचे आरोग्य सुदृढ करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महापोषण अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमानाने हे अभियान राज्यातही सुरू करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने फुरसुंगी येथे या अभियानाला सुरवात करण्यात आली आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे यांच्या हस्ते कुपोषित मुलांच्या पाल्यांना धान्य किट, तसेच नुकत्याच जन्म झालेल्या मुलांच्या पाल्यांना बेबी किट देण्यात आले. तसेच, या अभियानाच्या माध्यमातून लहान मुलांना आहार कसा द्यावा, याबाबत माहिती देण्यात आली. अभियानांतर्गत विविध पोषक पदार्थांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. तसेच, उपस्थित महिलांना हे अभियान घराघरात पोहोचवण्याकरिता शपथ देण्यात आली.
अभियानात पुणे जिल्ह्यातील २४ लाख ७६ हजार महिलांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना या अभियानाचे महत्त्व सांगितले जात असून कुपोषित मुलांचे वजन, उंची घेणे आणि कोरोना काळात आरोग्याची काळजी कशी घेतली जावी, याबद्दलच्या सूचनाही दिल्या जातात. अभियानाद्वारे गावागावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध अन्न-धान्यातून मुलांना कसे खाऊ घालावे? काय काय दिले पाहिजे. कमी वजनाच्या मुलांचे वजन वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत माहिती दिली जात असल्याचे महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे यांनी सांगितले.
हेही वाचा- मराठा आरक्षण: अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन