पुणे - मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. भाजप आम्हाला त्यांच्या चिन्हावर लढण्याची विनंती करत असेल, तर ती आम्हाला मान्य नाही. आम्ही युती केली तर ती स्वाभिमानानेच करू, अन्यथा करणार नाही. कारण तसे केल्यास ही युती नाही बेकी ठरेल, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. ते पुण्यामध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय रासप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते.
इतक्या दिवसानंतर युती संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून संपर्क करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. मात्र, युती आणि आघाडीकडून आम्हाला आमच्या पक्षाऐवजी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे कदाचित या माध्यमातून आम्हाला व्यवस्थेतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय? अशी शंका असल्याचे जानकर म्हणाले.
युतीच्या जागावाटपात माढ्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळण्याची अपेक्षा असून, बारामतीमधून राहुल कुल यांच्या कुटुंबातील सदस्याला भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासंदर्भात मी विचार करत असून, लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले. भाऊ आणि बहीण म्हणून मी अनेकांच्या जवळ गेलो होतो. त्यांनी ही आपली जबाबदारी स्वीकारली नाही, अशी खंतही महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता बोलून दाखवली.