पुणे : राज्यातील सर्व धर्मीय मंदिरे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वारकरी संप्रदायासाठी महत्वाची मानली जाणारी कार्तिकी वारी आणि संजीवन समाधी सोहळा कसा पार पडणार याबाबत राज्यसरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माऊलीचे समाधी दर्शन..
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अलंकापुरीचे संत ज्ञानेश्वर माउलींचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. कोरोनामुळे देवस्थानाच्या वतीने थर्मल स्कॅन, सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे. यावेळी नागरिक, भाविक, वारकऱ्यांनी संजीवन समाधी मंदिरात दर्शनावेळी रांगेत मंदिर परिसरात स्पर्श करु नये, गर्दी करुन नये, आणि मास्कचा वापर करुनच माऊलींच्या चरणी यावे. तसेच, ज्या भाविकांना कोरोनाची लक्षणे असतील अशा लोकांनी कोरोना समूह संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी; असे आवाहन आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केले आहे.
वारकऱ्यांच्या वारीवर कोरोनाचे संकट कायम..
संजीवन समाधी मंदिर गेल्या सात महिन्यांपासून दर्शनासाठी बंद होते. मात्र, आता दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर खुले केले जाणार आहे. आषाढीवारीचा नयनरम्य सोहळा यावर्षी मर्यादित लोकांमध्ये साजरा करण्यात आला होता. मात्र आता होणारा कार्तिकी वारी सोहळा आणि संजीवन समाधी सोहळा मंदिरे खुली करण्याच्या निर्णयामुळे मोठ्या भक्तीभावे साजरा होणार का, तसेच याबाबत काय निर्बंध राहणार याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.
संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी वारी..
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अलंकापुरीत आठ डिसेंबरपासून कार्तिकी वारी होत आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक, वारकरी, दिड्यांचा जनसमुदाय आळंदीत दाखल होत असतो. यावेळी आळंदीत ठिकठिकाणी राहुट्या लावल्या जातात. संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी वारी होत असताना आळंदीत हॉटेल, दुकाने, राहुट्या लागतात. तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित असतो. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार काय भूमीका घेते, याकडे वारकरी संप्रदायासह भाविक, व्यापारी यांचेही लक्ष लागले आहे. भाविक आणि वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी देवस्थान, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजाणी केली जाणार आहे.
हेही वाचा : अखेर सोमवारपासून राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी, मात्र 'या' नियमांची अट