भीमाशंकर (पुणे) - दार उघड.. देवा दार उघड.! असे म्हणत आज राज्यभर भाजपने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली. मात्र, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असताना भाजपने भीमाशंकर बंद विरोधात कुठलीच भूमिका न घेतल्याने भीमाशंकर परिसरातील आदिवासी बांधव
लॉजिंगसह पुजेचे साहित्य, वनऔषधी विक्री, हॉटेल व्यवसायिक यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर डोंगर-रांगांच्या जंगल वस्तीत वसलेले आहे. या ठिकाणी असणारी दुकाने, हार-फुलांचे गाडे, हॉटेल अशा सर्वांचा उदरनिर्वाह मंदिर व पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद आहे. या परिसरातील पर्यटनास बंदी असल्याने भाविक व पर्यटक फिरकलेच नाहीत. त्यामुळे व्यावसायिक व सामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. मात्र, याकडे प्रशासनासह आंदोलनकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
हेही वाचा - मंदिरं बंद; उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार, भाजपाचे ‘लाक्षणिक उपोषण’
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात देशभरातून दिवसाला हजारो भाविक हजेरी लावत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे भीमाशंकर मंदिर 12 मार्चपासून बंद ठेवण्यात आले आहे. याचा परिणाम परिसरातील हॉटेल, लॉजिंगसह पुजेचे साहित्य, वनऔषधी विक्री करणाऱ्या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांवर झाला आहे. कोरोनामुळे भाविक, पर्यटकांचा वावर नसल्याने या व्यावसायिकांवर बेकारीची वेळ आली आहे.