पुणे - मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी मुंबईहून आलेल्या युवकाला पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी ही कारवाई केली आहे. आरोपीकडून 6 ग्रॅम 850 मिली मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 54800 रुपये इतकी आहे. अशोक किट्टू पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अंमली पदार्थाची विक्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस लोणीकाळभोर पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना लोणी काळभोर परिसरातील टोलनाक्याजवळ एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अशोक पुजारी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्यांना त्याच्या खिशामध्ये मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल लोणीकाळभोर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.