पुणे - लोणावळाकरांनी जुना पुणे - मुंबई महामार्ग रोखून धरत रास्ता रोको केला. वाढते अपघात शहर वासियांच्या जिवावर उठू लागल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. तीच वेळ रास्ता रोकोसाठी निवडण्यात आली. त्यामुळे, महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली होती. एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले होते.
हेही वाचा - Girl Child Birth Rate : बीड जिल्ह्याची त्यांना बदनामी करायची आहे, धनंजय मुंडे यांचा रोख कुणाकडे?
लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको करत ठिय्या मांडला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरातील या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. अनेकदा एमएसआरडीसी आणि आयआरबीला पत्रव्यवहार केला, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या महामार्गावर डिव्हाईडर, स्पीड ब्रेकर, लाईट अशा सुविधा करणे गरजेच्या आहेत. या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी वारंवार मागणी करण्यात आली. परंतु, एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीने त्याला गांभीर्याने घेतले नाही. म्हणूनच आक्रमक पवित्रा घेत, महामार्गावरील कुमार रिसॉर्ट चौकात रास्ता रोको करण्यात आला.