पुणे- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने यावर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढीची केलेली घडण, लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा हिरीरीने पुरस्कार व प्रसार त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात घडवून आणलेले गुणात्मक बदल यासाठी सोनम वांगचुक यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर वांगचुक यांना जाहीर झालेला पुरस्कार औचित्याचा ठरणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केली. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यावेळी उपस्थित होते.
दरवर्षी लोकमान्यांच्या पुण्यतिथीदिनी, 1 ऑगस्टला पुण्यात टिळक स्मारक मंदिरामध्ये होणार्या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या गंभीर संकटामुळे त्यादिवशी कार्यक्रम होणार नाही, मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर योग्य नियोजन करुन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल, असे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्काराचे यंदाचे 37वे वर्ष आहे. 1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यापूर्वी एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन तर मागीलवर्षी बाबा कल्याणी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे, असे नमूद करून डॉ. टिळक यांनी सांगितले की, लडाख सीमेवरील अलिकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी उत्पादनांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सोनम वांगचुक यांनी स्वदेशीचा पुरस्कार हेच चीनच्या आव्हानाला खरे उत्तर ठरेल, अशी ठाम भूमिका मांडली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग जागतिक पातळीवर दखल घेणारे ठरले. स्थानिक समुदायाचा विकास करण्यासाठी त्यांनी राबविलेले अभिनव उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरले आहेत.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना होय! कोरोनाचे संकट दूर झाल्यावर पुण्यातच वांगचुक यांना प्रत्यक्ष पुरस्कार दिला जाईल. टिळक स्मृती शताब्दीनिमित्त केसरी मराठा संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यासह देशभरातील विविध संस्था संघटनांनी अनेक उपक्रम राबवून आधुनिक भारताच्या या शिल्पकाराला आदरांजली अर्पण केली.