बारामती (पुणे) - टाळेबंदीमुळे राज्यासह देशाची अर्थव्यवस्था थंडावली आहे. विविध व्यापार, उद्योगधंदे बंद असल्याने करोडोंची उलाढाल ठप्प आहे. मागील दोन महिन्यांत बंद दरम्यान बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीसह जळोची व सुपे बाजार समितीला सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
बारामती बाजार समितीत भुसार मालासह फळे व पालेभाज्यांतून दररोजचे १२ लाख रुपयांचे तर जनावरांच्या बाजारातून महिन्याकाठी सव्वा कोटींचे उत्पन्न मिळत होते. मात्र टाळेबंदीमुळे मागील २ महिन्यांत बाजार समितीला तब्बल ३० कोटी रुपयांचा फटका बसला असल्याची माहिती बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
टाळेबंदी अगोदर जनजीवन सुरळीत असताना बारामती बाजार समितीसह जळोची आणि सुपे उपबाजारात मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत होती. सातारा, सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, शिरुर, इंदापूर, फलटण, दहिवडी आदी भागातील शेतकऱ्यांनी आणलेल्या ज्वारी, बाजरी, गहू, मका, हरभरा मालाची मोठी आवक होत होती. त्यातून दररोज लाखोंची उलाढाल होऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडत होते. मात्र टाळेबंदीत वाहतूकव्यवस्था ठप्प असल्याने व मालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांना व बाजार समितीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच जनावर बाजारात मोठ्या प्रमाणात काष्टी, नगर, सोलापूर, अकलूज आदी भागातून गाई, म्हशी, बैल यांची कोट्यावधींची खरेदी विक्री होत होती. माञ या जनावर बाजाराला ही टाळेबंदीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांसह बाजार समितीला नुकसान सोसावे लागले आहे.
३० कोटींचा फटका-
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीला महिन्याकाठी जवळपास ८ कोटी रुपये मिळत होते. मात्र टाळेबंदीत मागील २ महिन्यांत १६ कोटींचा फटका बसला. तसेच जळोची येथील जनावरे बाजारातून मिळणारे ३ कोटी व फळे व भाजीपाल्यातील ८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सुपा येथील बाजारातून ३ कोटी असे एकंदरित ३० कोटी रुपयांचा बाजार समितीला फटका बसला आहे.
टाळेबंदीत बाजार समितीसह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. टाळेबंदीत बाजार समित्यांना व शेतकऱ्यांना बसलेल्या आर्थिक फटक्याचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना व बाजार समितीत्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.