बारामती : तालुक्यातील मगरवाडी येथे वन विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यामुळे स्थानिकांमध्येभीतीचे वातावरण पसरले आहे. बागायती पट्यात प्रथमच बिबट्याचे दर्शन घडले आहे. उद्योजक संग्राम सोरटे यांनी ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. त्यानंतर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्यासह योगेश कोकाटे, विठ्ठल जाधव, नंदू गायकवाड यांनी प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला.
वनाधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
उद्योजक संग्राम सोरटे यांच्या शेतावर पंधरा दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास गायीच्या गोठ्यातील कर्मचाऱ्यांना बिबट्या ट्रॅक्टरच्या उजेडात दिसला होता. यानंतर हरीदास सोरटे यांना उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर येताना दिसला. पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास संग्राम सोरटे यांच्या फार्मवर पुन्हा बिबट्या आढळुन आला. याची माहिती मिळाल्यानंतर वनाधिकारी आणि पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि पाऊलखुणांची पाहणी केली. तसेच प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधत माहिती घेतली असता, तो बिबटयाच असल्यावर शिक्कामोर्तब झाले. बागायती पट्टा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. बिबट्या फलटण तालुक्यातून नीरा नदी ओलांडून आला असवा असा अंदाज व्यक्त होत आहे. वनविभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले असून एक पथक गस्तीसाठी ठेवले आहे.
हेही वाचा - बेस्ट इनोव्हेटिव्ह फार्मर: बारामतीतील शेतकऱ्यांची किमया न्यारी, सामूहिक शेतीतून उत्पन्न भारी