पुणे - शिकारीच्या शोधात कुत्र्याच्या मागे लागलेला बिबट्या कुत्र्यासह विहिरीत पडला. जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथे ही घटना घडली आहे. यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला असून वनाधिकाऱ्यांसह स्थानिकांचे बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या शिकारीसाठी लोकवस्तीत भटकंती सुरु आहे. बिबट्या रात्रीच्या सुमाराम लोकवस्तीत येऊन प्राण्यांवर हल्ला करुन शिकार करत आहे. अशातच शिकारीमागे धावत असताना बिबट्यांचे अनेक वेळा अपघातही होत आहेत.
एकाच आठवड्यात जुन्नरच्या परिसरात दोन ठिकाणी बिबट्या विहिरीत पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर एका बिबट्याचा पुणे-नाशिक महामार्गावर अपघात झाला आहे. त्यामुळे बिबट्या शिकारीच्या शोधात असताना होणाऱ्या अपघातांची मालिका सुरुच असल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वनविभाग मात्र, बिबट्याच्या संगोपनासाठी कुठलीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.