पुणे - हाथरस प्रकरणाचा बोलबाला करणारे आता कुठे झोपले आहेत, मुंबई-महाराष्ट्रात रोज हाथरस घडतं, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शिरूरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका झोपडीत राहणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. रात्रीच्या वेळी ही महिला शौचाला जात होती. यावेळी अज्ञाताने तिच्यावर हल्ला चढवला. महिलेने विरोध केल्याने धारदार शस्त्राने तिचे डोळे निकामी करण्यात आले. अद्याप हल्लेखोर फरार आहे. यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. सरकार यावर काही करणार आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - पुण्यात महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी...हल्लेखोर फरार
माझे डोळे परत द्या...
प्रविण दरेकर यांनी पीडितेची भेट घेतल्यानंतर महिलेने डोळे परत देण्याची मागणी केली. माझे डोळे परत द्या, मी सगळा घटनाक्रम सांगते, अशी आर्जव या महिलेने केली. पीडित महिलेचे डोळे परत आणण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरा, अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्याचे दरेकरांनी सांगितले. महिलेची प्रकृती हळूहळू सुधारत असली, तरीही डोळ्यांबाबत डॉक्टरांनी कोणतेही सकारात्मक विधान केले नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे डोळे वाचण्याची शक्यता कमी आहे, असे दरेकरांनी सांगितले.
नक्की काय झालं 'त्या' रात्री?
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे शौचास गेलल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली. तसेच पीडितेवर प्राणघातक हल्ला केल्याचे देखील उघडकीस आले आहे. या प्रकारादरम्यान विरोध करताना महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संबंधित महिला गंभीर जखमी असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात हल्लेखोरांविरोधात शिरूर पोलिसांनी विनयभंग करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.