पुणे - तुमच्या जन्माच्या दिवशी नक्की कोणता वार होता, हे तुम्हाला चटकन आठवले का? नाही ना! पण पुण्यातील एक अवलिया गेल्या दहा हजार वर्षातील कोणत्याही माणसाच्या जन्मतारखेवरून त्याच्या जन्माचा वार एका क्षणात सांगू शकतो. त्यांची 'हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड' मध्ये नोंद देखील झाली आहे. लक्ष्मण गोगावले, असे या अवलियाचे नाव आहे.
काल २८ फेब्रुवारीला विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. विज्ञान म्हटले की गणिताची सोबत हवीच. मात्र, अनेकांच्या मनात गणिताबद्दल भीतीच असल्याचे पाहायला मिळते. रुक्ष आकडमोड, प्रमेय, समीकरणे हे गणिताची भीती वाढवतात, असे अनेकजण सांगतात. मात्र, गणिताशी मैत्री केली तर हा विषय मजेशीर होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण लक्ष्मण गोगावले यांनी दाखवून दिले. त्यांचे खेड शिवापूर सारख्या लहान गावामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांची शालेय जीवनापासूनच गणिताशी मैत्री होती. त्यानंतर त्यांनी पुणे गाठले. त्याठिकाणी नोकरी करत आपली गणिताची आवड जोपासली. याच कालावधीमध्ये त्यांनी गणितामध्ये संशोधन केले. दर २८ वर्षानंतर दिनदर्शिकेची पुनरावृत्ती होते, हे त्यांनी शोधून काढले. त्यासाठी त्यांनी २८ वर्षांचा एक तक्ता बनवला आहे आणि तो त्यांना तोंडपाठ देखील आहे. त्यामुळे ते हजारो वर्षातील कोणत्याही तारखेचा वार अवघ्या काही सेकंदामध्ये सांगतात आणि समोरच्याला आश्चर्यचकीत करतात. गोगावले यांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले. मात्र, त्यांनी गणित विषयावर आतापर्यंत तब्बल १२ पुस्तके लिहिली आहेत. आता त्यांना विक्रम करून गिनीज बूकमध्ये नाव नोंदवायचे आहे.