जुन्नर (पुणे) - तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगर परिसरातील भिवाडे बुद्रुक गावातील जमिनीला भेगा पडून घर, रस्ता, जनावरांचा गोठा, विहिरी, विजेचे खांब पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच घटनेचा पंचनामा करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पंचनाम्याचा अहवाल पाठविला आहे.
जुन्नर तालुक्यातील भिवाडे बुद्रुक येथे राहणारे शिवाजी विरणक या आदिवासी शेतकऱ्याचे घर डोंगराच्या खुशीत व नदीपात्रापासून काहीच अंतरावर आहे. या परिसरात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहे. तर आज (25 ऑगस्ट) सकाळपासून भेगा पडण्याचे प्रमाण वाढले. सकाळी अचानक वितणक यांच्या घराला तडे जाऊन घराच्या भिंती पडल्या. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेने विरणक यांचा संसार ऐन पावसात उघड्यावर आला आहे. जमिनीला पडलेल्या भेगा पाहून गावकऱ्यांमद्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सह्याद्रीच्या परिसरात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओली व भुसभुसीत होत आहे. यामुळे जमिनीला भेगा पडू लागल्याने नागरिकांची भिती अधिकच वाढली आहे. मागील दोन दिवसांत भेगा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना करण्याची करावी, अन्यथा पुन्हा माळीण सारखी दुसरी घटना घडेल, अशी भिती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - ईटीव्ही स्पेशल : लॉकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीचे भांडण; अनेकांचे संसार विस्कटले!