पुणे : नऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी गावात रविवारी सायंकाळी स्थानिक महिला आपल्या घरासमोर बसली होती आणि त्यांची लहान मुले बाहेर खेळत होती. त्याचवेळेस दुचाकीवरून काही तरुण वेगाने गाडी पळवत ये-जा करत होते. महिलेने मुले खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवण्याची विनंती केली. त्याचा राग मनात धरुन त्या तरुणांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळात हातात तलवार व कोयते घेऊन ते तरुण इतरांना सोबत घेऊन आले. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवेली पोलिसांनी याची दखल घेतली. पोलिसांची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल : या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला आहे. गावातील एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी या सराईतांनी त्याला धमकावल्याचीही महिती मिळाली आहे. गांजाची नशा करुन हे सराईत सातत्याने गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुण्यात महत्त्वाचे कार्यक्रम, पण गुन्हेगारी शिगेला : पुणे शहरात आगामी होत असलेली आंतरराष्ट्रीय जी-२० परिषद, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांकडून शहर पिंजून काढण्यात येत आहे. कोयता घेऊन गुन्हेगारी करणाऱ्यांवरही पोलिसांकडून निगराणी ठेवण्यात येत आहे. या मोहीमेत आतापर्यंत जवळपास 185 कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण 72 गुन्हेगारांना यामध्ये अटक करण्यात आली आहे. असे असले तरी शहरात कोयता गँगची दहशत काही कमी होताना दिसत नाही.
कोयता गॅंगकडून हॉटेलची तोडफोड : पुणे शहरातील भवानी पेठेतील तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असे म्हणत कोयता गँगकडून 5 जानेवारी, 2023 रोजी हॉटेल निशा रेस्टॉरेन्टची 5 ते 6 जणांकडून तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र आरोपींना अजूनही अटक झालेली नाही.
पोलिसांचा धाक उरला तरी कोठे ?: शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कोयता गँगच्या माध्यमातून दहशत पसरवली जात आहे. पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र, असे असताना देखील पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही कमी होण्याचे नाव घेत नाही. कोयता गँगकडून हॉटेल निशा रेस्टॉरेन्टच्या तोडफोडीनंतर हॉटेल व्यावसायिकांमध्ये रोष वाढत आहे. याबाबत लष्कर पोलीस ठाण्यामध्ये 6 अनोळखी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अद्यापही या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा : Thane Crime : पाण्याच्या रिकाम्या बाटलीमुळे अट्टल चोरटा ९९ लाखांच्या मुद्देमालसह गजाआड