पुणे: घटनेतील जखमी तरुणाचे नाव अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून या जखमी तरुणाचा पंजा पुन्हा जोडला. ही घटना सुखसागर येथील स्मार्ट मेन्स पार्लरसमोर बुधवारी दुपारी साडेचार वाजल्याच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी अभिजीत दुधनीकर (वय २३, कात्रज) याने पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रार केली होती. त्यावरुन पोलिसांनी आकाश चाबुसकर, रोहीत बोद्रे, प्रेम गुंगारगे, कविराज देवकाते, युवराज देवकाते आणि त्याच्या अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
थांबा तुमचा मर्डरच करतो: याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आणि त्याचे साथीदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध फिर्यादी यांनी पूर्वीही तक्रार दाखल केली होती. याच गोष्टीचा राग हा आरोपींना होता. बुधवारी दुपारच्या सुमारास सुखसागर परिसरात फिर्यादी अभिजीत आणि लाडप्पा हे दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना वाटेत अडविले. तुम्ही केस करता का आमच्यावर? एवढी हिम्मत झाली का? तुम्ही थांबा. आता तुम्हा दोघांचा खूनच करतो असे धमकावत आरोपींनी फिर्यादी यांना पकडून कोयत्याचे सपासप वार केले. यावेळी फिर्यादी आणि त्याच साथीदार पळून जात असताना त्यांना पकडून या सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाडप्पा याच्यावर देखील वार केला. तेव्हा लाडप्पा याने बचावासाठी डावा हात पुढे केला असता त्यावर आरोपींनी वार केला. यात त्याचा मनगटापासून पंजा तुटला.
आरोपी घटनास्थळावरून फरार: यावेळी आरोपी हे घटनस्थळावरून फरार झाले. घटनेंनंतर फिर्यादी अभिजीत आणि लाडप्पा हे दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून लाडप्पा यांचा पंजा पूर्वरत जोडला.अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
झोपलेल्या व्यक्तीवर कोयत्याने हल्ला: पुण्यात मध्यरात्री शिवाजीनगर भागात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या मैदानासमोर 17 जानेवारी, 2023 रोजी एका पंचेचाळीस वर्षांच्या व्यक्तीला चार लोकांनी कोयता घेऊन मारहाण केली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना सोमवारी इतर दोघांना आज ताब्यात घेतले. हा वाद वैयक्तिक भांडणातून झाल्याचे आणि यात कुठलीही कोयता गॅंग सहभागी नसल्याचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ अरविंद माने यांनी सांगितले होते. तक्रारदार सतीश काळे यांचे एका टोळीच्या सदस्याबरोबर चार महिन्यांपूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची केली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काळेवर खुनी हल्ला केला होता. याप्रकणी दाद्या बगाडे, दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चार चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.