पुणे - कोरेगाव भीमा विजय स्तंभाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा, अशी मागणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने केली आहे. तसेच कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना जिल्हाबंदी करण्यापेक्षा अटक करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो अनुयायी 1 जानेवारी रोजी पेरणे येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासंबंधी माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीचे राहुल डंबाळे बोलत होते.
यावेळी डंबाळे म्हणाले, आम्ही आंबेडकरी जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिसांना संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी केली होती. ती अजूनही प्रलंबित आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार घटना घडून १८ महिने झाले. अद्यापही भिडे गुरुजी यांना ग्रामीण पोलीस प्रशासनाने साधा संपर्कही केलेला नाही. त्यामुळे त्यांना अटक करून पुढील कार्यवाही व्हावी. मात्र, 1 तारखेपर्यंत त्यांना जिल्हाबंदी केली याबाबत समाधानी आहोत.
हेही वाचा - पालिका महालक्ष्मी येथे बांधणार केबल दोरखंडांचा भव्य पूल, 'इतका' होणार खर्च
याप्रकरणी 22 एफआयआर दाखल आहेत. अट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 30 दिवसात चार्जशीट दाखल करणे आवश्यक असताना 2 महिन्यात उलटूनही ते झालेले नाही. मागील सरकारच्या सुचनेनुसार गुन्हे दडवलेले आहेत. त्यामुळे हा तपास नव्याने सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले होते. याबाबत पंतप्रधान कार्यालय, सांस्कृतिक, संरक्षण विभाग, पुरातत्व विभागाशी संपर्क सुरू आहे. या कामाला सुरुवात झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उंची इमारत उभी न करता ब्रिटिश वॉर म्युझियम हेरिटेज धर्तीवर विकास व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा - 'तरुणांनो, मोदी-शाह यांनी तुमचे भविष्य उद्धवस्त केले.. भारताची विभागणी करुन द्वेषामागे लपण्याचा प्रयत्न'
यावेळी समितीचे राहुल डंबाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जयदेव गायकवाड उपस्थित होते.