पुणे - भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला विजयस्तंभावर शौर्यदिवस साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. भीमा कोरेगाव, शिक्रापूर, सणसवाडी, पेरणेफाटा लोणीकंद या परिसरात कुठल्याही पद्धतीने सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट आली आणि ती पोलिसांच्या निदर्शनास आली तर अशा प्रत्येक ग्रुपअॅडमिनवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 250 ग्रुपअॅडमिनला लेखी नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
नोटीसनुसार, हद्दीतील कुठल्याही व्हॉट्सअॅप ग्रुपअॅडमिनसह ग्रुपमेंबरपैकी कुणीही समाजविघातक, ऐतिहासिक विपर्यासाची, सामाजिक भडकाऊ टीकाटिप्पणी पोस्ट करू नये. असे केल्यास मेसेज, इमेज किंवा व्हिडिओ शेअर केल्यास सर्वप्रथक ग्रुपअॅडमिनला अटक करण्यात येईल. तसेच त्यावर आयटी अॅक्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - ८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा प्रवास
यावर्षीच्या 1 जानेवारी विजयस्तंभ शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सतर्क झालेले आहेत. मागील महिन्यापासूनच या परिसरातील सोशल मीडियावर पोलिसांची नजर आहे. यातूनच 250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस दिली आहे. यानंतर पोलिसांनी आता सोशल मीडियाकडे आपला मोर्चा वळविला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून इन्स्टाग्राम, टिकटॉक, हॅलो अॅप आदींसह फेसबुक-व्हॉट्सअॅपच्या राज्यातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 150 ग्रुप आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 100 ग्रुप अॅडमिनला वैयक्तिकरीत्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.